Karuna Sharma : करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली ‘ती’ घटना
Karuna Sharma And Satish Bhosale NEws : करुणा शर्मा आणि खोक्या उर्फ सतीश भोसले यांचा एक फोटो सध्या समोर आला आहे. या फोटोवर आज करुणा शर्मा यांनी स्पष्टीकरण देत खोक्या सोबत ओळख कशी झाली याबद्दल खुलासा केला आहे.
ज्या प्रकारे खोक्या भोसले याचं घर पाडण्यात आलं आहे, त्याच प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या घरावर देखील बुलडोजर चालवा, अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे. आज बीडच्या परळी न्यायालयात धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुनावणी होणार आहे. करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीत शपथ पत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. यावेळी न्यायालयात हजर होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांसही संवाद साधला.
पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या की, मी गहिनीनाथ गडावर दर्शनाला जात असताना मला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अडवून गडावर जाण्यास बंदी केली होती. त्यावेळी हा खोक्या भोसले मला तिथे भेटला होता. भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत येतो, तुम्हाला गहिनीनाथ गडावर दर्शन घेण्यासाठी जाता येईल, असं त्याने मला सांगितलं होतं. पण माझ्यामुळे याठिकाणी वाद नको असं म्हणून मी पुढे जाण्याचा निर्णय रद्द केला होता. तेवढीच त्याची आणि माझी ओळख आहे. तिथला एक फोटो देखील आता व्हायरल होत आहे. मात्र माझे सीडीआर, लोकेशन सगळं पोलिसांनी तपासावं त्यांना कुठेही काही दिसणार नाही, असंही यावेळी करुणा मुंडे यांनी म्हंटलं आहे.