kirit somaiya : ‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’, मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना, शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा सोबत
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या अधिकच आक्रमक झाले आहेत. हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत.
मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) अधिकच आक्रमक झाले आहेत. हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत 40 ते 50 गाड्या भरून शेकडो कार्यकर्ते दापोलीला (dapoli) रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिला. घरातून निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही मीडियाला दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनधिकृत बांधकाम असणाऱ्या मंत्र्यांचं हॉटेल तात्काळ पाडावं. आज जर हे रिसॉर्ट पाडलं नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी जोरदार हल्ला केला.