नार्वेकरांची ‘ती’ कृती बाळासाहेब ठाकरेंच्या संस्कृतीतूनच, किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?
शिंदे गटाला आता काही काम राहिलेलं नाही, त्यामुळे हा नाराज, तो महाराज... अशा अफवा ते पसरवत असतात, असं वक्तव्य पेडणेकर यांनी केलंय.
मुंबईः मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच त्यांच्या अजून एका कृतीने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्यात. उद्धव ठाकरे गटातील मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नार्वेकर यांची ही कृती बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कृतीतूनच झाली आहे. शुभेच्छा देणं ही आपली राजकीय संस्कृती आहे. मीसुद्धा अमित शहांना शुभेच्छा देते, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलंय. तसेच मिलिंद नार्वेकर शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. शिंदे गटाला आता काही काम राहिलेलं नाही, त्यामुळे हा नाराज, तो महाराज… अशा अफवा ते पसरवत असतात, असं वक्तव्य पेडणेकर यांनी केलंय.