अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री पद सांभाळण्याची योग्यता, त्यामुळेच…; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली इच्छा
आता राष्ट्रवादीतील हे नाराजी आणि राजीनामा नाट्य शांत झालं असून शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही आप आपल्या दौऱ्यांवर व्यस्त आहेत. याचदरम्यान आता राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने ते मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आणि इच्छा असल्याचे म्हटले आहे.
कोरेगाव : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे सांगितले जात आहे. तर ते भाजपमध्ये जातील आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री होतील अशाही चर्चा सुरू होत्या. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि या सर्व बातम्या आणि चर्चा कोपऱ्यात गेल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादीतील हे नाराजी आणि राजीनामा नाट्य शांत झालं असून शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही आप आपल्या दौऱ्यांवर व्यस्त आहेत. याचदरम्यान आता राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने ते मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्त्यांची भावना आणि इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण गरम होत आहे. सातारा कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. यावेळी त्यांनी, अजित पवार हे आमच्या पक्षाचे असल्याने आम्हाला ते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं. तर त्यांच्यात ती योग्यता आहे. शरद पवार यांच्या प्रमाणेच त्यांच्या कामांचा सपाटा आहे. त्यांनाही महाराष्ट्रातील प्रश्नांची प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. त्यामुळे असा अभ्यासू व्यक्ती मुख्यमंत्री व्हावा असे तसेच राष्ट्रवादीच्या लोकांनाही वाटतं