‘गोगावले पालकमंत्री होणारच नाहीत’; विरोधी पक्ष नेत्याचा खोचक टोला
सर्वाधिक निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना देण्यात आला आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यातच त्यांनी शिंदे गटातील नाराज आमदार भरत गोगावले यांना सर्वाधिक निधी दिला.
मुंबई | 25 जुलै 2023 : अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या गटासह, भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना विकासासाठी निधी छप्पर फाड दिला आहे. यात सर्वाधिक निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना देण्यात आला आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यातच त्यांनी शिंदे गटातील नाराज आमदार भरत गोगावले यांना सर्वाधिक निधी दिला. त्यांना पालकमंत्री पद देता आलं नसलं तरी १५० कोटींचा निधी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे गोगावलेंना मंत्रिपद मिळणार नाही म्हणून एवढा प्रचंड निधी दिला आहे काय? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता हाच सवाल दबक्या आवाजात केला जात आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील जोरदार टीका करताना शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे तिसरे मंत्रिमंडळ विस्तारच होईल की नाही असा टोला लगावला आहे. यावेळी दानवे यांनी, या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारच होणार नाही हे माहित नाही, त्यामुळे रायगडचे पालकमंत्री पद घेऊन काय बसलाय असा खोचक सवाल केला आहे. तर हा मंत्रिमंडळ विस्तारच होणारच नाही असे देखील त्यांनी म्हटलं आहे.