अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांच्याच पक्षातील नेते करत आहेत; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. तसेच त्यांच्याबाबत वावड्या उठवण्याचे, बदनामी करण्याचे काम हे त्यांचेच लोक, महाविकास आघाडी करत असल्याचे म्हटलं आहे
नागपूर : विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलेले आहे. याबाबत खुद्द अजित पवार यांनीच स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी आपल्या जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही यावर दबक्या आवाजात चर्चा सुरूच आहेत. आताही प्रकरण शांत होत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. तसेच त्यांच्याबाबत वावड्या उठवण्याचे, बदनामी करण्याचे काम हे त्यांचेच लोक, महाविकास आघाडी करत असल्याचे म्हटलं आहे. तर अजित पवारांनी भाजपशी कुठलाही संपर्क केलेला नाही. वा भाजपने त्यांच्यांशी. त्यामुळे भाजपप्रवेशावरून भाजपमध्ये अशी कोणतीही चर्चा नाही. तर अजित पवार यांचे विरोधक अशा बातम्या तयार करत असतील, त्यांची बदनामी कोण करत आहे हे त्यांनीच पाहावे, असे म्हणत बावनकुळे यांनी स्प्ष्टीकरण दिले आहे.