‘खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं’, एकनाथ खडसे यांना पुन्हा कुणी डिवचलं?
सत्ता बदलल्यानंतर जिल्हा दूध संघात 6 कोटी 72 लाखांचा तोटा झाला. चुकीच्या धोरणामुळे हा तोटा झाला आहे असे म्हणत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण आणि संचालक मंडळावर निशाना साधला होता.
जळगाव : 24 सप्टेंबर 2023 | राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांची वृत्ती लोकांना माहिती होती आणि त्यामुळेच लोकांनी त्यांना घरी बसवलं. ‘खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं आहे. खडसे साहेबांचे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को, असं म्हणत जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी खडसेंवर सडकून टीका केलीय. जळगाव जिल्हा दूध संघ तोट्यात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यावर अध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय. जिल्हा दूध संघाला झालेला तोटा हा खडसे यांच्या कार्यकाळातील आहे. त्यांचे उष्टे खरकटे आम्ही साफ करतोय. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यात फारसा अर्थ नाही, असे म्हणत जोरदार पलटवार केलाय. दरम्यान, यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या मंगेश चव्हाण आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा शाब्दिक संघर्षाला सुरुवात झाली आहे.