शिंदे-भाजप सरकारचा ट्रेलर महाराष्ट्रला कोणता पिक्चर दाखवणार? आमदारांच्या राड्यावरून सामनातून टीका
ये तो एक ट्रेलर था, अशी धमकी दिली जात असेल तर शिंदे गट भविष्यात महाराष्ट्राला कोणता पिक्चर दाखवण्याच्या तयारीत आहे? असा सवाल आमदारांच्या राड्यावरून सामनातून करण्यात आला आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधकांनी पायऱ्यांवर दिलेल्या घोषणांवर काल सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला. मात्र असे करत असताना शिंदे गटातील आमदार आणि महाविकास आघाडीतील आमदार हे गावगुंडासारखे एकमेकांच्या अंगावर गेल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात बाचाबाची झाली. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडले आहे. यावेळी सामनाच्या अग्रलेखातून, महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक समृद्ध अशी राजकीय परंपरा आहे; पण ही मौलिक परंपरा पायदळी तुडवली गेली. सत्तारूढ शिंदे गटाने विधिमंडळाच्या आवारात घडवलेल्या धुमश्चक्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. त्यानंतरही ये तो एक ट्रेलर था, अशी धमकी दिली जात असेल तर शिंदे गट भविष्यात महाराष्ट्राला कोणता पिक्चर दाखवण्याच्या तयारीत आहे? असा सवाल आमदारांच्या राड्यावरून सामनातून करण्यात आला आहे.