थोडक्यात वाचलो अन्यथा आज श्रध्दांजलीचा कार्यक्रम : अजित पवार
पुणे येथील एका कार्यक्रमादरम्यान पेटत्या समईला लागून खासदार सुप्रिया सुळे यांची साडी जळाली. सुप्रिया सुळे जशा या अपघातातून त्या वाचल्या तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे ही काल एका अपघातातून वाचले आहेत.
पुणे : पुणे येथे दोन हॉस्पिटलचे उदघाटन विरोधी पक्षनेते अजित पवार ( AJIT PAWAR ) यांच्या हस्ते झाले. यातील दुसऱ्या हॉस्पिटलच्या उदघाटनावेळी अजित पवार असलेल्या लिफ्टला अपघात झाला. चौथा मजल्यावरून ही लिफ्ट थेट खाली कोसळली. सुदैवाने या अपघातातून अजित पवार बचावले आहेत.
आज आणखी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनीच या घटनेची माहिती दिली. डॉक्टरांच्या आग्रहाखातर तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेलो. पण, लिफ्ट वर जाईना, काही वेळानं लाईट गेली. अंधार गुडूप…
काही कळायच्या आतच चौथ्या मजल्यावरून लिफ्ट धाडदिशी खाली आली. खोटं नाही सांगत आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम होता. मला भीती माझ्यासोबत असलेल्या असलेल्या हर्डीकर डॉक्टरांची होती. कालच वडिलांची पुण्यतिथी होती आणि मला काही झालं असतं तर माझ्याही श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता अशी कबुली त्यांनी यावेळी दिली.