MPSC परिक्षेचा गोंधळ संपता संपेना, आता ‘या’ कारणामुळे विद्यार्थी हैराण
एमपीएससी हॉल तिकीटलिक प्रकरणानंतर ही परिक्षा रद्द होते की काय अशी धाकधुक उमेदवारांमध्ये होती. मात्र कोणताही डाटा लिक झाला नसून उमेदवारांची माहिती सुस्थित असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली. त्यानंतर आज परिक्षेला सुरूवात झाली आहे.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) आज रविवार अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही परीक्षा घेण्यात येत आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील एकूण 1 हजार 475 परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या परिक्षेसाठी राज्यभरातून सुमारे 4 लाख 67 हजार 85 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यापैकी साधारणपणे 80 टक्के उमेदवारांची परीक्षेला उपस्थिती आहे. तर एमपीएससी हॉल तिकीट (Hall Ticket) लिक प्रकरणानंतर ही परिक्षा रद्द होते की काय अशी धाकधुक उमेदवारांमध्ये होती. मात्र कोणताही डाटा लिक झाला नसून उमेदवारांची माहिती सुस्थित असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आली. त्यानंतर आज परिक्षेला सुरूवात झाली आहे. तर बायोमेट्रिक मशिनवर (Biometric Machine) हजेरी घेत उमेदवारांना सोडलं जात होतं. यावेळी काही ठिकाणी बायोमेट्रिक मशिन बंद पडल्याने उमेदवारांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर मात्र सरसकट उमेदवारांना परिक्षा केंद्रात सोडण्याचा निर्णय एमपीएससीकडून घेण्यात आला. त्यामुळे झालेला गोंधळ थांबला.