काल तब्बेतीचं कारण आणि आज थेट गुजरात दौरा? नाना पटोलेंवर प्रश्न चिन्ह
काल तब्बेत बिघडल्याच्या कारणाने सभेला नसणारे नाना पटोले गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान येत आहे.
मुंबई : महाविकास आघाडीची पहिलीच वज्रमूठ जाहीर सभा ही काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. या जाहीर सभेला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे बडे नेते उपस्थित राहणार होते. त्याप्रमाणे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि जयंत पाटील, तर काँग्रेस तर्फे अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली. मात्र यादीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर राहिले. त्यांची प्रकृतीत बिघाड झाल्याने ते हजर राहू शकले नाही असे सांगण्यात येत असतानाच आता मविआत मतभेद आहेत की काय असे समोर येत आहे. कारण काल तब्बेत बिघडल्याच्या कारणाने सभेला नसणारे नाना पटोले गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान येत आहे.
मानहानीच्या खटल्यातील शिक्षेविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आज सोमवारी सुरत न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. यावेळी अशोक गेहलोत (राजस्थान), भूपेश बघेल (छत्तीसगड) आणि सुखविंदर सिंग सुखू (हिमाचल प्रदेश) या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीही त्यांच्यासोबत असतील. तेव्हा याचसाठी नाना पटोले हे गुजरातला जात असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र काँग्रेस अंतर्गत पटोलेंना विरोध असल्यानेच ते काल सभेला गेले नाहीत अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.