मनोज जरांगे यांचे शिष्टमंडळ सरकारला भेटणार, कुणाचा समावेश? ‘आता त्यांनी समजून घायचे…’
मुख्यमंत्री यांच्या भेटीला गेल्यावर ते कुठे आम्हाला राज्यमंत्री, पंतप्रधान करणार आहेत? तिथे जायचे आणि आमचे काम मांडायचे. हे शिष्टमंडळ विजय मिळवून देईल नाही तर आमरण उपोषण सुरु आहेच. आम्हीच समजून घेतोय. आता त्यांनी समजून घ्यायचे आहे. ९ तारखेला बैठक होईल असा अंदाज त्यांनी वर्तविला.
जालना : 7 सप्टेंबर 2023 | ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्रांची कागदपत्रे आहेत त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, निजाम काळातील कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती तयार करण्यात आल्याचा जीआर सरकारने काढला आहे. याची माहिती माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना दिली. ‘आमच्यापेक्षा जरांगे पाटील यांची यंत्रणा strong दिसते. सकाळीच त्यांनी जीआर नाकारला. त्यामुळे विनंती करायला आलो आहे. जीआर नाकारला असला तरी यामध्ये ज्या काही सुधारणा सुचवायच्या असतील तर सह्याद्री, वर्षा बंगला किंवा मंत्रालय येथे यावे. शक्य नसेल तर पाटील जे पाठवतील त्यांना मुंबईत घेऊन जाऊ’ असे त्यांनी सांगितले. त्यावर जरांगे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांच्या भेटीला जाईल असे जाहीर केले. या शिष्टमंडळात 16 ते 17 जण असतील. यात काही घटनेचे अभ्यासक, मराठा आरक्षणाचे अभ्यासक, ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक, काही आंदोलक, शेतकरी असतील. मजबूत शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांच्या भेटीला पाठवू म्हणाले.