चारही बाजूंनी मराठ्यांनी मुंबईत घुसायचं पण शांततेत, मनोज जरांगे पाटील यांनी केलं आवाहन
मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मराठा तरुण येत्या 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. मराठ्यांच्या कुणबी म्हणून 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत. तरीही मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मराठा तरुणांनी मिळेल ते वाहनांनी चारही दिशांनी मुंबईत घुसावे. परंतू शांततेच आंदोलन करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
बीड | 14 जानेवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 20 जानेवारीला मुंबईत शिरण्यासाठी चारही दिशेने घुसण्याचे आवाहन मराठा समाजाला केले केले आहे. मराठा मुलांच्या भविष्यासाठी ही शेवटची संधी असल्याने सर्वांनी शांततेत यायचे आहे असे त्यांनी म्हटले आहे. मराठ्यांच्या कुणबी म्हणून 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. एका नोंदीवर चार जणांना जरी आरक्षण मिळाले तरी चार कोटी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले आहे. परंतू आरक्षण मिळाले म्हणून तुम्ही घरी बसू नका मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळण्यासाठी मुंबईला जाऊन शांततेत मागणी करणे गरजेचे आहे. आपण एकजूट दाखविली तरच हे सरकार आपल्या पदरात आरक्षण पाडणार आहे. त्यामुळे येत्या 20 जानेवारीला मिळेल त्या वाहनांनी मुंबईला निघा, आपल्या पोरांना आशीर्वाद देण्यासाठी गोदा पट्ट्याच्या 123 गावातील महिला अंतरवाली सराटीला येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. एक जण आता कागदं वाचून दाखवत आहे. त्याला एक दिवस लोकांना भजं खाऊन टाकलेली कागदंच खायला लावीन तर गप बसीन असेही जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका करताना म्हटले आहे.