आता एक ओबीसी, एक लाख ओबीसी म्हणाल का ? पंकजा मुंडेंच्या सल्ल्याला जरांगेंनी हे दिलं उत्तर
मराठा समाजाच्या आंदोलनानंतर 27 जानेवारी रोजी सरकारने अध्यादेश काढून कुणबीच्या सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्यातील अडचण दूर केली आहे. मात्र यामुळे ओबीसीमधील आरक्षणातील वाटेकरी वाढणार असल्याने ओबीसी नेते छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे आदींनी टीका केली आहे. मराठ्यांसाठी अध्यादेश निघाल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वागत केले आहे. परंतू आता मराठा समाजाची एक पिढी ओबीसीमध्ये येणार असल्याने त्यांनी आता 'एक मराठा...लाख मराठा', अशी घोषणा देण्याऐवजी, 'एक ओबीसी, लाख ओबीसी' अशी घोषणा द्यावी असे आवाहन केले होते. त्यावर आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
जालना/बीड | 28 जानेवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या मागणीनूसार सगेसोयरेची व्याख्या स्पष्ट करणारा अध्यादेश काढला आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन तूर्त मागे घेत मुंबईतून आपले गाव अंतरवाली सराटी गाठले आहे. या अध्यादेशाला ओबीसी नेते छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे आदींनी विरोध केला आहे. यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आता मराठा समाजाची एक पिढी ओबीसीमध्ये आली आहे. त्यामुळे त्यांनी आता एक मराठा, लाख मराठा म्हणण्याऐवजी ‘एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही असे म्हटले आहे. ओबीसींमध्ये दाटीवाटी होणार आहे हे नक्की. परंतू दोन्ही समाजात वितुष्ट होऊ नये याची जबाबदारी आता मराठा समाज आणि सरकारची आहे असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. यावर मराठा नेते मनोज जरांगे यांची प्रतिक्रीया विचारता त्यांनी, ‘ एक कोटी मराठाही आम्हीच, ओबीसी आणि मराठा दोन्ही आम्हीच आहोत. शेतकरी आम्हीच आणि लढाऊ क्षत्रिय शेतकरीही आम्हीच आहोत. 100 टक्के आरक्षण होणार आहे. तेवढे हो द्या. मग देऊ प्रतिक्रीया’