देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला, मनोज जरांगे पाटील यांची जोरदार टीका
मराठा आमदारांना माझ्या विरोधात बोलायला लावायचे असे आपल्या विरोधात कॅपेन सुरु आहेत असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या 14 महिने आमचा लढा सुरु आहे, त्याचा निर्णय उद्या 20 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उद्या 20 ऑक्टोबर रोजी आंतरवली सराटीत बैठक घेऊन उमेदवारांना पाडायचे की आपले स्वत:चे उमेदवार उभे करायचे याचा निर्णय घेणार आहे. माझा मराठा समाज माझ्यापाठी आहे, मला वारंवार शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही. लोकांनी टीका केली होती की मनोज जरांगे पाटील यांना लोकसभेपुरता पाठींबा होता त्या लोकांची तोंडे दसरा मेळावा पाहून बंद झाली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा समाज भाजपात मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपातील मराठ्यांना देखील वाटत होते फडणवीस न्याय देतील. परंतू त्यांनी जातींना ओबीसीत घातले परंतू मराठ्यांना नाही हे पाहून भाजपातील मराठे देखील नाराज झाले आहेत असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या तोंडाशी आलेला घास घालवला असल्याची टीकाही जरांगे पाटील यांनी केली आहे. लेकरंच जर जगली नाहीत तर नेत्याला मोठा करुन काय करायचं, नेत्यांची पोरं परदेशात शिकत आहेत. नाईलाजाने मला राजकारण शिकावं लागलं आहे असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.