गुजरात लॉबीचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या नार्वेकरांना मराठी माणूस क्षमा करणार नाही, संजय राऊत कडाडले
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल अखेर लागला आहे. विधानसभा अध्यक्षांनी हा निकाल देत शिवसेना एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. या प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना उखडून फेकण्याचे गुजराती लॉबीचं स्वप्न एका घटनात्मक पदावरील एका मराठी माणसाने पूर्ण केले आहे. मराठी माणूस त्यांना कधी क्षमा करणार नाही अशी टीका राऊत यांनी केली आहे.
मुंबई | 10 जानेवारी 2024 : शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला आहे. या निकालावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टिका केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्रातून उखडून फेकायची हे गुजराती लॉबीचं स्वप्न घटनात्मक पदावर बसलेल्या मराठी व्यक्तीने पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस हे कधी विसरणार नाही, त्यांना कधी क्षमा करणार नाही. यांची अवस्था एके दिवस मुसोलीनी सारखी होईल असेही राऊत यांनी म्हटले आहे. बाळासाहेबाची शिवसेना अशी मातीमोल करणे हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अघोरी प्रकार आहे. पण शिवसेना यातून उभी राहील, उभी रहात आहे असेही ते म्हणाले. प्रभू श्रीरामाचे नाव घेण्याचा त्यांना काही अधिकार नाही. प्रभू राम सत्यवचनी होते. त्यांनी वडीलांच्या इच्छेसाठी वनवास पत्करला. येथे ज्या शिवसेनेने पोसून मोठे केले त्याला शिवसेनेला वनवासात पाठविण्याचे काम तु्म्ही केले आहे. तुम्हाला इतिहास क्षमा करणार नाही अशा कठोर शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राची पुढली पिढी क्षमा करणार नाही. हा निकाल दिल्लीहून टाईप करून आलेला आहे. शिवसेना संपविणे म्हणजे महाराष्ट्राला संपविणे असेही राऊत यांनी म्हटले आहे.