भंडारा, १५ ऑगस्ट २०२३ | मध्यान्ह भोजन योजनेच्या नावाखाली कंत्राटदरानं पुरवठा केलेली आहार सामग्री अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यातील चणा, वाटाणा आणि डाळीला कीड लागली असून तांदूळ ठेवलेल्या कोठीत जिवंत उंदीर आढळून आलेत. हा सर्व धक्कादायक प्रकार भंडाऱ्यातील नेरला इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची 24 तासात चौकशी करून तत्काळ अहवाल सदर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी दिलेत. यात दोषींवर कारवाई करू असं आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर ग्रामस्थांचा रोष शांत झाला.
मध्यान्ह भोजन आहाराची सामग्री पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, हे साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं तपासणीत सिद्ध झाल्यानं जिल्हा परिषद शिक्षण समितीनं सदर कंत्राटदारानं पुरवठा केलेली सामग्री वापस न्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी, असा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीनं घेतला आहे. यानंतरही या कंत्राटदाराचं साहित्य पुरवठ्याचं काम थांबलेलं नाही. अशातच पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नेरला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शनिवारी मध्यान्ह भोजन उपक्रमात शिजवलेल्या भोजनात मोठ्या प्रमाणात किडे आढळून आल्यानं पालकांनी शाळेतील शिक्षकांना धारेवर धरल्याचे समोर आले आहे.