‘शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी आपले सरकार सदैव कटिबद्ध!’; भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया
राज्यात कांदा निर्यातीवरील निर्णयाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. राज्याच्या अनेक भागात त्या निर्णयाचा निशेध केला जातोय. तर आता यावरून केंद्र सरकारने देखील निर्णय घेतला आहे.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | राज्यातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर जापान दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी राज्यातील बळिराज्याला दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. तर केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल असेही ते म्हणाले. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यावरून ट्विट करत आनंद आणि आभार व्यक्त केला आहे. यावेळी भूजबळ यांनी, केंद्र सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असून या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो. कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येवल्यासह राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यातून नक्कीच फायदा होणार आहे. फडणवीस यांचे मनापासून आभार! केंद्र सरकारचे मनापासून आभार! महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करून त्या ठिकाणी ही खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे लासलगाव, येवल्यासह राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.