‘पवार साहेबांना कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’; वळसे पाटील यांचा यु टर्न
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शरद पवार गट आक्रमक झाला. तर आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी जोरदार टीका केली. तसेच खासदार संजय राऊत यांनी देखील वळसे पाटील यांना आरसा दाखवला.
मुंबई : 21 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान केलं. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. तर वळसे पाटील यांनी केलेल्या त्या विधानाला आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. तर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट वळसे पाटील यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत त्याविधानाचा निशेष केला आहे. त्यानंतर आता वळसे पाटील यांनी आपल्या त्या विधानावरून थेट घुमजाव करत त्याचे खापर मिडियावर फोडले आहे. यावेळी त्यांनी, माझ्या विधानाचा माध्यमांनी चुकीच्या अर्थ लावत. तर माध्यमांनी त्याचा विपर्यास केला. गेली ४०-५० वर्ष पवार यांनी देश आणि राज्यासाठी काम केलं. पण त्यांना इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणे स्वत:च्या हिंमतीवर सत्तेवर बसता आलेलं नाही. महाराष्ट्रातल्या जनतेनं पवार यांच्या मागे अशी ताकद उभी केली नाही. याची खंत मी बोलून दाखवली. माझा पवार साहेबांना कमी लेखण्याचा किंवा त्यांच्या बद्दल काही चुकीचं बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तर आंबेगावची जनता काय करते हे निवडणुकीत पाहू. पवार आमचे नेते आहेत व भविष्यातही राहतील असेही त्यांनी म्हटलं आहे.