मुश्रीफ-सतेज पाटील यांच्या दोस्तीचा बंध तुटला? मुश्रीफ यांच्या प्रस्तावावर सतेज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं…
मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या राजकारणामागेच हा जिल्हा फिरत आला आहे. मात्र आता त्यांच्या दोस्तीचा जमाना संपणार की काय अशी शंकाच निर्माण झाली आहे. काही दिवसांपुर्वीच मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना महायुतीत येण्याचा प्रस्ताव दिला होता.
कोल्हापूर, 23 जुलै 2023 | कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात दोन नेते महत्वाचे मानले जातात. त्यात नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात गेलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते माजी मंत्री सतेज पाटील. मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या राजकारणामागेच हा जिल्हा फिरत आला आहे. मात्र आता त्यांच्या दोस्तीचा जमाना संपणार की काय अशी शंकाच निर्माण झाली आहे. काही दिवसांपुर्वीच मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना महायुतीत येण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर ते ही काँग्रेसमधून महायुतीत जातील का? असे अनेक प्रश्न कोल्हापूरसह राज्याच्या राजकारणात विचारले जात होते. यादरम्यान सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांचा तो प्रस्ताव धुडकावला आहे. यावरून पाटील यांनी उघड भाष्य करताना, पुढील निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार, आम्ही महायुतीबरोबर जाऊ शकत नाही. त्यात माझ्या बाबतीत कोणताही विषय नाही हे सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मुश्रीफ यांनी ऑफर दिली असली तरी मी महायुतीसोबत जाणे शक्यच नाही अशी ठाम भूमिका सतेज पाटील यांनी घेतली आहे. तर राज्यात आणि देशात अविश्वासाचा राजकारण सुरू असून सर्वसामान्यांना विश्वासाचे वातावरण हे काँग्रेसच देऊ शकतं. राष्ट्रवादीत जरी फूट पडली तरी काँग्रेस एकसंघ आहे. काँग्रेसमध्ये फूट पडणार नाही असे यावेळी सतेज पाटील यांनी म्हटले आहे.