पुण्यात अल्पवयीन बहिणींची अत्याचारातून हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचारातून हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात दोघा अल्पवयीन बहिणींवर शेजाऱ्यानेच अत्याचार करुन त्यांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपींचे हैदराबाद प्रमाणे एन्काऊंटर करावे अशी मागणी भटक्या विमुक्तांनी केलेली आहे.
कल्याण येथे अल्पवयीन मुलीचे अत्याचारातून हत्येचे प्रकरण घडल्यानंतर पुण्यातील राजगुरुनगर येथे असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका ५४ वर्षांच्या इसमाने दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात परराज्यात पळून जाण्याचा प्रयत्नात असलेला आरोपी अजय दास याला लागलीच अटक केली आहे. या प्रकरणात भटक्या – विमुक्त समाजाच्या लोकांनी पुण्यात निदर्शने केली आहेत. गोसावी समाज हा भिक्षा मागून जगणारा समाज आहे. या समाजाला सरकारने वाऱ्यावर टाकले आहे. एवढ्या जनकल्याणाच्या योजना आहेत. परंतू एकाही योजनेचा भटक्या विमुक्ताला लाभ होत नाही. आम्हालाही अॅट्रासिटी कायद्याचे संरक्षण द्यावे, दोन्ही मुलींच्या पालकांना २५ लाख प्रत्येकी नुकसान भरपाई द्यावी आणि आरोपीचे हैदराबाद पॅटर्न प्रमाणे भर चौकात एन्काऊंटर करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.