Video | मनसे नेते वसंत मोरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, काय राजकारण रंगतंय
लोकसभा निवडणूकांसाठी उमेदवारांची चाचपणी सर्व पक्षांकडून सुरु असतानाचे मनसेचे नेते वसंत मोरे यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे. अर्थात मोरे यांनी ही राजकीय भेट नसून मैदानाच्या आरक्षण संदर्भातील होती असे म्हटले आहे.
पुणे | 27 फेब्रुवारी 2024 : मनसेचे नेते वसंत मोरे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे. मनसेतील वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनी उघडपणे आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एका कार्यक्रमात साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचं आहे असे म्हटल्याने वसंत मोरे नाराज असल्याचे म्हटले जात आहे. यावर वसंत मोरे यांनी सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघातील भुखंडाचे मैदानासाठीचे आरक्षण उठवू नये यासाठी आपण भेटायला आल्याचे सांगितले. योगायोगाने आपली शरद पवार यांच्याशी भेट झाल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे. आपण पुणे लोकसभेसाठी इच्छुक असून तेथून जर अमित ठाकरे साहेब निवडणूक लढविणार असतील तर आपला त्यांना पाठींबा असल्याचे म्हटले आहे.