Raj Thackeray | मुंबई-गोवा हायवेवरुन मनसे आक्रमक, राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याकडे राज्याचं लक्ष
Mns Raj Thackeray On mumbai goa highway | मनसेप्रमुख राज ठाकरे यांची तोफ उद्या बुधवारी 16 ऑगस्टला पनवेलमध्ये धडाडणार आहे.
पनवेल | मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. मात्र त्यानंतरही या महामार्गाची स्थिती जैसे थेच आहे. राज्य सरकारकडून गणेशोत्सवाआधी एकेरी मार्ग सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र आतापर्यंत अशा अनेक डेडलाईन दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोकणकर हे संतप्त झाले आहेत. महामार्गाची झालेली दुरावस्था यावरुन मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
त्यानुसार, पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके सभागृहात मनसेचा निर्धार मेळावा होणार आहे. मनसेचे शहराध्यक्ष योगेश चिले यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. मुंबई-गोवा महामार्गाबाबत या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे मनसेप्रमुख या निर्धार मेळाव्यात काय बोलतात, या महामार्गाबाबत अल्टिमेटम देतात की आणखी काही भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.