Raj Thackeray : ‘यापुढे विचार करा, अन्यथा…’, राज ठाकरे यांनी दिला शिंदे सरकारला गंभीर इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला दिला आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं असेही ते म्हणाले
मुंबई : 14 सप्टेंबर 2023 | मराठा आरक्षणासाठी गेले 17 दिवस मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते ते त्यांनी मागे घेतले ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं असा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. पण, हे उपोषण सोडवताना राज्य सरकारने जी आश्वासने पूर्ण होऊ शकत नाही तशी कोणतीही आश्वासने दिली गेली नाहीत अशी आशा करतो, असा चिमटा काढला. महाराष्ट्रात १७ दिवस जे काही घडलं, ते पुन्हा घडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चरितार्थाची चिंता तरुण तरुणींना भेडसावत आहे. अशावेळी त्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत. कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल असे ते म्हणाले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात याचे भान येऊन पोटातलं ओठावर आणताना सरकार यापुढे विचार करेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.