Raj Thackeray : राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले ‘हे’ मोठे बदल
MNS Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षात झालेल्या संघटनात्मक बदलाबद्दल माहिती दिली आहे. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत हे बदल करण्यात आले आहेत.
मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांच्यानंतर 3 जिल्हा उपाध्यक्ष असणार आहेत. उपाध्यक्षांनंतर विभाग अध्यक्ष असणार आहेत. मनसेने आतापर्यंत मुंबईसाठी कधीही अध्यक्षांची नेमणूक केली नव्हती. आता मात्र थेट पहिल्यांदाच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली आहे. एप्रिल महिन्यात संपूर्ण राज्यात समिती नेमणार असल्याचं देखील यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता पालिका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अॅक्शन मोडवर आलेले आहेत. पक्ष बळकट करण्यासाठी ठाकरे प्रयत्नशील असल्याचं बघायला मिळत आहे. त्यासाठी पक्षात काही संघटनात्मक बदल करून राज ठाकरे यांनी भाकरी फिरवली असल्याचं आज बघायला मिळालं आहे. मनसेने आपल्या पक्ष संघटनेची सगळी रचना बदलली आहे. यात मनसेचे पहिले मुंबई अध्यक्षपद संदीप देशपांडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर, केंद्रीय समितीमध्ये विभाग अध्यक्षांची जबाबदारी नितीन सरदेसाई यांच्याकडे आहे. अमित ठाकरे यांच्याकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी असणार आहे. बाळा नांदगावकर यांच्याकडे गटाध्यक्ष केंद्रीय समितीची जबाबदारी असणार आहे.