‘फुकट कसले पैसे देताय? आज लिहून देतो…’, लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारवर ओढले ताशेरे
'तुम्हाला गृहित धरलंय. माझ्या हातात सत्ता द्या. प्रत्येकाच्या हाताला काम असेल. पण ते जातीप्रमाणे दिली जाणार नाही. आरक्षण मिळू शकत नाही. ही गोष्ट होऊ शकत नाही. हे प्रत्येकाला माहीत आहे. फक्त खरं बोलण्याचं धाडस राज ठाकरे करतो पण लोकांना परवडत नसेल. पण ती गोष्टच होऊ शकत नाही.', राज ठाकरे स्पष्टच म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा मुंबईतील गोरगाव येथे पार पडला. मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना धारेवर धरले. इतकंच नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर ताशेरे ओढले. ‘आज लिहून देतो. लाडकी बहीण योजनेचे या महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील. नंतर पैसे येणार नाही. जानेवारी फेब्रुवारीत राज्याकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतं तुम्हाला फुकट. महिलांच्या हातांना काम द्या. कामातून त्या पैसे उभे करतील. त्यांना सक्षम बनवा. एवढ्या सक्षम महिला आहेतच. त्यांना मार्ग दाखवा’, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज्यात योजना काढून फुकट कसले पैसे देताय. बेरोजगारांना फुकट पैसे. शेतकऱ्यांना फुकट वीज. शेतकरी कुठे मागतो फुकट वीज. तो म्हणतो वीजेत सातत्य द्या. कमी पैश्यात द्या. पण वीज तर द्या. राज्यात कोणी काही मागत नाही. यांना फुकट देण्याच्या सवयी लावायच्या आहेत. एकदा सवयी लागल्या तर इतर राजकीय पक्ष तेच करतील. नागडा होणार महाराष्ट्र. राज्य म्हणून काही विचार करणार की नाही? असा थेट सवालही सरकारला राज ठाकरेंनी केला आहे.