तर, मनसेचा एक आमदार वाढेल, हिंदू महासंघाचे आवाहन काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदू महासंघ यांच्या भूमिका एकसारख्या आहेत. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणुकीत मनसेने आम्हाला पाठिंबा द्यावा असे आवाहन हिंदू महासभेने केले आहे.
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील आदेश येईपर्यंत मनसैनिकांनी कोणत्याही पक्षाचा प्रचार करू नये असा आदेश काढला आहे. पण, राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असे आवाहन हिंदू महासभेने केले आहे. कसबा पेठ निवडणुकीत हिंदू महासंघाकडुन आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हिंदू महासंघ आणि मनसेची राजकीय भूमिका एकसारखी आहे. आरक्षणाविषयी आमची भूमिका सारखी आहे. बाबासाहेब पुरंदरे, दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी आणि छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजी हे कट्टर हिंदुत्ववादी होते अशा त्यांच्या आणि आमच्या भूमिका सारख्याच आहेत. राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला किंवा तटस्थ राहिले तर त्याचा कोणालाही फायदा होणार नाही. त्यामुळे मनसेने हिंदू महासंघाला पाठिंबा द्यावा. पण, आम्हाला मतदान केल्यास त्याचा नक्की फायदा होईल. आमचा विजय आणखी सोपा होईल. हिंदू महासंघाचे मताधिक्य वाढेल आणि मनसेचा एक आमदार वाढेल. राज ठाकरे यांनी याचा विचार करावा, असे आवाहन उमेदवार आनंद दवे यांनी केले आहे.