गणेश सोळंकी, बुलढाणाः मविआचे आमदार रात्री-अपरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटतात, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलाय. आदित्य ठाकरे (Aditya Thakceray) यांनी प्रतपागड म्हणजेच मेहकर मध्ये येऊन सभा घेतलीय आणि स्थानिक आमदार खासदार यांच्यावर ,गद्दार म्हणत टीका केलीय.. याला प्रत्युत्तर देत खासदार प्रतापराव जाधव यांनी गौप्यस्फोट केला..
जाधव म्हणाले की , सत्ता गेल्यापासून काँग्रेस राष्ट्रवादी किंवा ठाकरे गटातील आमदार अस्वस्थ आहेत.. आमच्या मुख्यमंत्र्यांना रात्री बेरात्री भेटतात आणि मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतात.. हे स्वतः खासदार प्रतापराव जाधव यांनी पाहिले असल्याचे म्हणाले.. मात्र त्यांची अस्वस्थता किती दिवस टिकेल हे पाहावे लागेल, अशी शक्यताही जाधव यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार-खासदार शिंदे गटात आले आहेत. अजूनही अनेकजण शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही फुटण्याच्या चर्चांनी जोर धरलाय.
महाराष्ट्रातील काँग्रेस फुटणार, भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात काही आमदार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य फेटाळून लावलं. चंद्रकांत खैरे यांनी हे वक्तव्य मागेही घेतलं.
तरीही शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरल्यास भाजप प्लॅन बीच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता तर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिंदे गटाची ताकद अधिक वाढण्यासंबंधीचं वक्तव्य केलंय.
प्रतापराव जाधव म्हणाले, फक्त ठाकरे गटाचे आमदार खासदारच नाही तर महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे आमदार खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रात्री भेटायला जातात. सह्याद्रीवर एकांतात भेट घेतात. मी सुद्धा हे अनुभवलं आहे. आमदार-खासदार मुख्यमंत्र्यांना भेटतात, ही गोष्ट खरी आहे.