‘…टिमकी मिरवणाऱ्या मुख्यमंत्री’; बागलकोटमध्ये शिवरायांचा पुतळा हटवल्यावरून राऊत यांची शिंदे यांच्यावर बोचरी टीका
कर्नाटकमधील बागलकोटमध्ये प्रशासनाने रात्रीच्या अंधारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला. यावरून राज्यात आणि सिमा भागात सध्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुंबई : 19 ऑगस्ट 2023 | कर्नाटकात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे हटविण्याचे काम सुरू आहे. येथे गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी शिवाजी महाराज यांचे पुतळे हटविण्यावरून वाद समोर आले आहेत. आता देखील असा प्रकार कर्नाटकमधील बागलकोटमध्ये समोर आला असून यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रकार बागलकोटमध्ये झाला असून नगरपालिका प्रशासनानं रात्रीच्या अंधारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला. त्यामुळं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका विधानावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी राऊत यांनी याबाबत आम्ही माहिती घेत आहे. मात्र हे सरकार झोपले आहे का? मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जबाबदारी नाही? सरकार झोपा काढत आहे का? असा सवाल केला आहे. तर हा प्रश्न त्यांनी विचारा. शिंदे हे आधी टिकरी मिरवायचे ना, की मी बेळगावला जाऊन लाठ्या काठ्या खाल्या. आता सिद्ध करा की लाठ्या काठ्या खाल्या होत्या की नाही ते.