कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा; राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी आज मतदान
253 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये बिनविरोध निवडणूक; तर थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात
मुंबई : आज राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी मतदान होतंय. राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी आज मतदान होणार आहे. 253 पैकी 18 बाजार समित्यांमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर इतर ठिकाणी थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात होणार आहे. पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या 143 जागांसाठी आज मतदान होतंय. त्यासाठी 321 जण रिंगणात आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी बाजार समित्यांसाठी आज मतदान होत आहे. 213 जागांसाठी 546 उमेदवार रिंगणात आहेत. अमरावती जिल्ह्यातील 12 पैकी 6 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय.छत्रपती संभाजीनगरमधील आज 4 बाजार समित्यांसाठीही आज मतदान होतंय. वाशिम जिल्ह्यातील 6 पैकी वाशिम आणि मानोरा या 2 बाजार समितीच्या 36 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असेल.