अजित पवार, बंडाची चर्चा अन् भाजपची भूमिका; सामनातून राजकीय परिस्थितीवर भाष्य
Saamana Editorial Ajit Pawar BJP : अजित पवार यांच्या बाबतीत वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम केलं, पण दादांनी कारस्थान उधळून लावलं; सामनातून राजकीय परिस्थितीवर भाष्य. पाहा...
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरणही दिलं. या सगळ्यावर आजच्या सामनात भाष्य करण्यात आलं आहे. “भाजपकडे स्वतःचे असे काहीच नाही. दुसऱ्या पक्षांतले लोक उधार घेऊन ते स्वतःचा पक्ष चालवीत आहेत. कधी शिवसेना, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वतःचे घर भरायचे.काँग्रेसवरही त्यांची वाईट नजर आहेच. धमक्या, दबाव आणि तपास यंत्रणांची सुरामारी यामुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्यच संपवून टाकले. अजित पवारांच्या बाबतीत वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम त्यांनीच केले. महाराष्ट्राला अस्थिर, बदनाम व गोंधळ निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. बरे झाले, अजित पवार यांनीच हे कारस्थान उधळून लावले. त्यामुळे तूर्तास तरी या विषयास पूर्णविराम मिळाला आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.