जितेंद्र आव्हाड नवे विरोधी पक्षनेते, शिवसेनेच्या नेत्याने उडवली खिल्ली; म्हणाला, “उतावळा नवरा अन्…”
अजित पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिकामी झाले होते. परंतु, अजित पवारांच्या बंडखोरीच्या अवघ्या दोन तासाच्या आतच शरद पवारांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी वर्णी लावली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने खिल्ली उडवली आहे.
ठाणे : रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काही नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालीना वेग आलं. अवघ्या दोन तासात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी वर्णी लावली. जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “जितेंद्र आव्हाडांना बहुतेक खूप घाई झाले आहे आणि ते वाटतच बघत होते अजितदादा कधी जातात, म्हणूनच विरोधी पक्षनेते पदाबाबत हे स्वत:च सांगत सुटले आहेत. मात्र विरोधी पक्षनेते पदाची निवड ही विधानसभा अध्यक्ष करतात. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचं उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं झालं आहे.”