‘ओंबाळे सारखे पोलीस कसाबला पकडताना शहीद होतात, तसं हे कंत्राटी पोलीस…’; आव्हाड यांचा संतप्त सवाल
कंत्राटी पोलीस भरतीत मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ही भरती राज्य सुरक्षा महामंडळामार्फत जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी करण्यात येणार आहे.
मुंबई | 26 जुलै 2023 : पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. या कंत्राटी पोलीस भरतीत मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ही भरती राज्य सुरक्षा महामंडळामार्फत जास्तीतजास्त ११ महिन्यांसाठी करण्यात येणार आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरलं आहे. तर यावरून टीका देखील विरोधकांनी केली आहे. याचमुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी, कंत्राटी पद्धत ही जगभरात नाहिशी होत असताना ती भारतात रजू लागली आहे. तर कंत्राटीकरण म्हणजे कामगारांचं शोषण आहे. कमी खर्च, कमी पगार, कामाचे तास वाढवणे असे प्रकार केले जातात. लोकांनाही कामाची गरज असते. पण पोलीस हा समाजातला मोठा घटक आहे. पोलीस हे जीवाचं राण करून १४-१४ तास ड्यूटी करतात. तर तुकाराम ओंबाळे सारखे पोलीस कसाबला पकडताना शहीद होतात, असं हे कंत्राटी पोलीस करतील का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.