ये जो पब्लिक है सब जानती है! चित्र बदलण्याच्या वक्तव्यावर भाजप नेत्याची पवार यांच्यावर सडकून टीका
त्यांनी सोलापुरात आपला मनोदय बोलून दाखवला. तसेच पुनश्च हरिओम करायचं आहे. वेगाने महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे. हाच निर्धार मी मनाशी पक्का केला असल्याचे सांगितले.
शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेत ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी राज्यात आपले दौरे सुरू केले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. नागरिकांशी संवाद साधत आहेत. यादरम्यान त्यांनी सोलापुरात आपला मनोदय बोलून दाखवला. तसेच पुनश्च हरिओम करायचं आहे. वेगाने महाराष्ट्राचं चित्र बदलायचं आहे. हाच निर्धार मी मनाशी पक्का केला असल्याचे सांगितले. त्यापार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवारांवर राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधताना, त्यांनी काय चित्र बदलायचं स्वप्न दाखवलं माहीत नाही. तुमच्या कोणत्याही थापांना राज्यातील जनता बळी पडणार नाही. प्रादेशिक वाद उभे करून लढाया लावण्याचे काम पवार यांनी केलं. कुटुंबा-कुटुंबात लढाया कुणी सुरू केल्या? राज्यातील सहकार चळवळ कुणी संपुष्टात आणली? खाजगीकरणाला वाव कोण देतंय? जनतेला सगळे समजते, जनता अडाणी नाही, अशी टीका विखे – पाटील यांनी केली आहे.