राष्ट्रवादीतील मतभेद पुन्हा समोर; जयंत पाटील एकटेच लढले? राष्ट्रवादीच्या बडे नेत्यांची दांडी?
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयासमोर ठिय्या करत निदर्शने केली. मात्र यावेळी फक्त एकच राष्ट्रवादीचा नेता तेथे दिवसभर उपस्थित होता. बाकीच्या बड्या नेत्यांनी मात्र दांडी मारल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशीवरुन राज्यातील राजकारण हे चांगलचं तापलेलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आंदोलन झाले. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयासमोर ठिय्या करत निदर्शने केली. मात्र यावेळी फक्त एकच राष्ट्रवादीचा नेता तेथे दिवसभर उपस्थित होता. बाकीच्या बड्या नेत्यांनी मात्र दांडी मारल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात मतभेद झाल्याचे दिसून येत होते. त्यावरून त्यांच्यात खटकेही उडत होते. याचदरम्यान जयंत पाटील यांची ईडीची चौकशी लागली आणि ते कार्यलयात हजर झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी राण उठवलं फक्त जितेंद्र आव्हाड दिवसभर तिथं हजर होते. मात्र राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात एकही वरिष्ठ नेता नव्हता. यामुळेच, ईडी चौकशीदरम्यान जयंत पाटील पक्षात एकाकी पडलेत का, अशी चर्चा सुरू झाली. तर त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये देखील यावरून नाराजी दिसत आहे.