मुंबईः जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर दाखल केलेला विनयभंगाचा (Molestation) आरोप चुकीचा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी केला आहे. महिलांविरोधातील कायद्यांचा हा गैरवापर सुरु असल्याची टीका त्यांनी केली. गर्दीतून धक्का लागला तर विनयभंग होत असेल तर मुंबईत असे दररोज 1-2 लाख विनयभंगाचे गुन्हे रजिस्टर करावे लागतील, अशी टिप्पणी त्यांनी केली.
विद्या चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिला आमदार-खासदारांचं एक शिष्टमंडळ यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महिलांशी वागताना सत्ताधाऱ्यांनी कशा प्रकारे वर्तन ठेवावं, याविषयी राज्यपालांकडून सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी जितेंद्र आव्हाड प्रकरणी प्रतिक्रिया दिली. मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये एका भाजप महिला पदाधिकाऱ्याने जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना काल विशिष्ट हेतुने स्पर्श केल्याचा आरोप केलाय.
विद्या चव्हाण म्हणाल्या, विनयभंगासारखा गुन्हा नोंदवण्यासारखा अपराध त्यांनी केलेला नाहीये. महिलांच्या सरंक्षणासाठी जे कायदे निर्माण केलेत, त्यांचा गैरवापर सरकार आणि पोलीस यंत्रणा गृहखात्याकडून करण्यात येत असेल तर तो अक्षम्य गुन्हा आहे. हा विनयभंगाचा गुन्हा होऊ शकत नाही, हे कायदेतज्ज्ञांनाही माहिती आहे. एखाद्या महिलेला गर्दीतून अगदी सभ्यपणे बाजूला करणं हा विनयभंगाचा गुन्हा असेल तर मुंबई शहरात रोज 1-2 लाख गुन्हे दाखल करावे लागतील…
आपण लोकलने प्रवास करतो, गर्दीतून जाताना चुकून स्पर्श झाला तर तिला आई-बहीण असल्यासारखे ट्रिट करतो. तिला जर आव्हाडजींनी केलं असेल… 2 दिवसात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एवढे गुन्हे दाखल करताय? देवेंद्र फडणवीसांकडे गृहखातं असताना अशा घटना घडत असतील तर मुख्यमंत्र्यांनी हे खातं स्वतःकडे घ्यावं, अशी मागणी आम्ही करतो….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणाऱ्या अब्दुल सत्तार प्रकरणावरून ही भेट होती. राज्यातील मंत्री आणि सत्ताधाऱ्यांनी महिलांविषयी बोलताना संयम बाळगावा, अशा सूचना राज्यपालांनी द्याव्यात, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती.
महिलांशी सभ्यतेने वागलच पाहिजे, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला समज द्यावी, ज्यांनी घटनेची, संविधानाची शपथ घेतली आहे, त्यांनी बोलताना हे बंधन पाळलंच पाहिजे, असं सेक्शन तुम्ही लागू केलं पाहिजे, अशी मागणी राज्यपालांना आज करण्यात आली.
यावरून राज्यपाल यांनीही आपण तशा सूचना मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत आणि निश्चितच त्यात तुम्हाला फरक दिसेल, असं आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती विद्या चव्हाण यांनी दिली.
त्यामुळे काही दिवस वाट पाहणार आहोत आणि त्यानंतर आम्ही महिला आमदार-खासदार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याचं सूतोवाच विद्या चव्हाण यांनी केलं.