Shrikant Shinde : मोठं यश, आता मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर श्रीकांत शिंदेंचे सूचक विधान
शिवसेनेने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. तर शिवसेना आणि धनुष्यबाण हे कुणाचे ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला दिलासा तर मिळाला आहे, पण खा. श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रीया खूप काही सांगून जाते.
मुंबई : शिवसेना (Shivsena Party) कुणाची ? या सुनावणीकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले होते. अखेर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे हे ठरवण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. तर निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती द्यावी ही शिवसेनेची याचिका अखेर फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे तर शिंदे गटाचा मार्ग सुखकर झाल्याचे बोलले जात आहे. या दरम्यानच खा. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घेण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. पण आता मार्ग मोकळा झाला आहे, असे म्हणत शिंदे गटाच्या अडचणी आता दूर झाल्याचे सांगितले जात आहे. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांचाच विजय होणार असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेला टोलाही लगावला आहे.