बाळासाहेबांच्या जन्मदिनी अवतरणार बाळासाहेबांचा ‘राज’
बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित नवीन नाटक रंगभूमीवर येत आहे. मात्र, या नाटकात बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भूमिका कोण करणार याची उत्सुकता निर्मात्याने कायम ठेवली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde ) यांनी उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) यांच्याविरोधात बंड करून स्वतःच्या पार्टीचे नामकरण ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे केले. आमच्याकडे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सातत्याने सांगत आहे. तर, शिवसेना सोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( mns chief raj thackarey ) यांनी आपल्याकडे बाळासाहेबांचा राजकीय वारसा असल्याचे जाहीर केले होते.
बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके शिष्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर नुकताच एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यातून बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ऋणानुबंध दाखविण्यात आले होते. तसेच आता बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित नवीन नाटक रंगभूमीवर येत आहे.
‘बाळासाहेबांचा राज’ असे या नाटकाचे नाव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात दुपारी ४ वाजता होणार आहे. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन अनिकेत बंदरकर याने केले आहे. या नाटकाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. मात्र, या नाटकात बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भूमिका कोण करणार याची उत्सुकता निर्मात्याने कायम ठेवली आहे.