एक एकर शेती, एक कोटींचे कर्ज, शेतकऱ्याने लावला डोक्याला हात
नागपूर जिल्ह्यातील २०० शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं. एक एकर शेतीवर एक कोटी, दिन एकर जमिनीवर ४८ लाख अशी कर्जाची रक्कम आहे. कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने त्यांना नोटीस पाठवली. ही नोटीस पाहून त्यांना घाम फुटला. गृहमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी तत्काळ कारवाईचे आदेश दिलेत.
नागपूर | 18 ऑक्टोंबर 2023 : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील डुमरी गावातील देवराव डोंगरे यांच्याकडे एक एकर शेती आहे. त्यांनी एक कोटींचं कर्ज घेतलं. याच गावातील ईश्वर काकडे यांच्याकडे दोन एकर जमीन आहे. त्यांनीही ४८ लाखांचे कर्ज घेतलं. या दोघांप्रमाणे जिल्ह्यातील सुमारे २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे. मात्र, या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे बँकेने त्यांना नोटीस पाठवली. ही नोटीस मिळताच शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला. कारण, या शेतकऱ्यांच्या नावाने फेक बॅंक खातं काढून कोट्यवधीचं कर्ज घेण्यात आलंय. फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केल. पण, मुख्य आरोपी फरार आहे. या शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आरोपीच्या अटकेची मागणी केलीय. गृहमंत्री फडणवीस यांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत.