आषाढीला येणाऱ्या भाविकांचा विमा उतरवणार, पंढरपूर मंदिर समितीचा मोठा निर्णय
आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसाठीची प्रशासकीय बैठक आज पंढरपुरात संपन्न झाली. या बैठकीत भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. मंदिर समितीकडून आषाढीला येणाऱ्या भाविकांचा विमा उतरवला जाणार आहे.
सोलापूर : आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसाठीची प्रशासकीय बैठक आज पंढरपुरात संपन्न झाली. या बैठकीत भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. मंदिर समितीकडून आषाढीला येणाऱ्या भाविकांचा विमा उतरवला जाणार आहे.पंढरपूरपासून 10 किमीपर्यंतच्या क्षेत्रात अपघात घडल्यास प्रत्येक भाविकास 2 लाखांचे विमा कवच देण्यात येणार आहे.मात्र, वारकरी संप्रदायाने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून पंढरपूरपर्यंत येणाऱ्या भाविकांना विमा सुरक्षा कवच देण्यात यावे अशी मागणी केली.वारकरी संप्रदायाच्या या मागणीवर प्रशासन सकारात्मक आहे. तसेच हरित वारी, स्वच्छ वारी या संकल्पनेवर यंदाच्या वारीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सुखकर व सुरक्षा संपन्न वारी पूर्ण करण्यासाठी सज्ज राहील. 29 जून रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे, 22 जून रोजी प्रमुख मानाच्या संतांच्या पालख्या या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतील.