नऊ वर्षानंतर पुन्हा असं घडलं, वैद्यनाथ हर हर तीर्थ कोरडं पडलं
नऊ वर्षानंतर प्रथमच हे तीर्थ कोरडे पडले आहे. त्यामुळे परळीकर काळजीत पडले आहेत. गणेश विसर्जन करण्याचे परळीतील हे पारंपारिक ठिकाण आहे. पण, या तीर्थात पाणीच नसल्याने यंदा गणरायाचे विसर्जन कसे करायचे असा प्रश्न पडला आहे.
परळी : 3 सप्टेंबर 2023 | देशातील १२ बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्वाचे असे पाचवे ज्योतिर्लिंग राज्यात परळी येथे आहे. परळीतील वैद्यनाथ हे देवस्थान जागृत देवस्थान मानले जाते. पण, याच देवस्थानावर वरुणराज नाराज झाला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, मराठवाडा अद्याप तहानलेलाच आहे. परळी तालुक्यात मागील 25 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे येथे आतापासूनच दुष्काळाची चाहूल जाणवू लागली आहे. परळीमधील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेले हरिहर तीर्थ कोरडे पडले आहे. या तीर्थामध्ये पाणीसाठा शिल्लक नाही. नऊ वर्षानंतर प्रथमच हे तीर्थ कोरडे पडले आहे. त्यामुळे परळीकर काळजीत पडले आहेत. गणेश विसर्जन करण्याचे परळीतील हे पारंपारिक ठिकाण आहे. पण, या तीर्थात पाणीच नसल्याने यंदा गणरायाचे विसर्जन कसे करायचे असा प्रश्न परळीकरांना पडला आहे.