मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांनी सुनावले, भाजप नेते कमजोर आणि दुर्बल
जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे मोदी वारंवार जातात. म्हणजेच स्थानिक भाजप नेते कमजोर आहेत, दुर्बल आहेत. त्यामुळेच ते सारखे मुंबईत येत आहेत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पण त्यांचे लक्ष मुंबई महापालिकेवर आहे. मोदी आधी मुंबईत येऊन गेले आताही येत आहेत. कर्नाटकात गेले. जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे मोदी वारंवार जातात. म्हणजेच स्थानिक भाजप नेते कमजोर आहेत, दुर्बल आहेत. त्यामुळेच ते सारखे मुंबईत येत आहेत. मात्र, याचा अर्थ मुंबई महापालिका जिंकण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप आणि मिंधे गटाचे लोक समर्थ नाहीत. आम्हाला आव्हान देण्यात ते फेल झाले आहेत. मोदी सारखे मुंबईत आले तरीही महापालिका शिवसेनाच जिंकेल. मोदी यांच्यावर मला टीका करायची नाही. पण, दिल्लीत संसद सुरू आहे. अदानी सारखा महत्त्वाचा विषय आहे. मोदी नेहमी कठीण प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. पण, विरोधकांनी विचारलेल्या सांडग्या आणि सोप्या प्रश्नांची उत्तर देण्यास टाळत आहेत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.