“नाना पटोले ते राष्ट्रवादी, अहो ठाकरे परिस्थिती पाहून ताबडतोब निर्णय घ्या”, प्रकाश आंबेडकर यांनी दिला सल्ला
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सावधतेचा इशाराही दिला आहे. “नाना पटोले इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लो प्रमाणे हवा कधी गरम, कधी नरम अशी वक्तव्य ते करतात. नागपुरात त्यांनी वक्तव्य केलं की काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना सावधतेचा इशाराही दिला आहे. “नाना पटोले इंग्रजी चित्रपट हॉट अँड ब्लो प्रमाणे हवा कधी गरम, कधी नरम अशी वक्तव्य ते करतात. नागपुरात त्यांनी वक्तव्य केलं की काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार. मविआत बसलं की म्हणतात आम्ही एकत्र लढणार. त्यामुळे हा संभ्रमाचा जो भाग आहे, त्याचं टार्गेट कोण आहे हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं”, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तसेच “शिवसेनेला आम्ही सावध करतोय की त्यांनी वेळेत सावध व्हावं,कारण भाजपच्या ईडीमार्फत जे डाव सुरू आहेत, त्यात राष्ट्रवादीचे अनेक नेते अडकणार आहेत. आत्ताही उद्धव ठाकरे यांना सूचना केली की सावध राहा. त्यासंदर्भात मी म्हटलं की नाना पटोलेंच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती पाहून ताबडतोब ठाकरे गटानं निर्णय घेतला तर अधिक चांगलं आहे”, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला.