“आता देशाची राजधानी दिल्ली नव्हे, तर अहमदाबाद”, प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर बोचरी टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 70 हजार कोटींचा घोटाळा केला असून शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मतं द्या असे म्हणत मोदींनी पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 70 हजार कोटींचा घोटाळा केला असून शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मतं द्या असे म्हणत मोदींनी पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मोदी सरकारच्या काळातही भष्ट्राचार झाला आहे, तो फक्त समोर आला नाही आहे. निवडणूका जाहीर करा राफेल भष्ट्राचार आणि पुलवामावर बोलणार. पाटण्यात एकत्र आलेले विरोधक एकत्र राहतील की, नाही माहिती नाही. मात्र 15 पक्ष एकत्र आल्यानंतर भाजपला धडकी भरलीय. कर्नाटक गेल्यानंतर इतर राज्यातही भाजपचा पराभव होऊ शकतो, त्यामुळे चार राज्याच्या निवडणुकाआधी मोदी लोकसभा निवडणुका घेणार,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “आता राजधानी दिल्ली नव्हे तर भारताची राजधानी अहमदाबाद झालंय. बीसीसीआयने सुद्धा वर्ल्ड कपची मान्यता अहमदाबादमध्ये दिली, यातून हेच स्पष्ट झालं आहे की, अहमदाबाद आता राजधानी आहे.”