नव्या वादाची शक्यता? प्रकाश आंबेडकर यांची औरंगजेबाच्या कबरीला भेट, फुलंही उधळली, डोकंही टेकवलं
कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाही काढला. ज्याला हिंसकवळण लागले आणि तोडफोडही झाली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिल्यामुळे नवा वादाला तोंड फुटू शकते.
छत्रपती संभाजीनगर : मागच्या काही दिवसांपासून औरंगजेबावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. राज्याच्या काही भागांमध्ये औरंगजेबाची पोस्टर्स आणि स्टेटसवरून तणाव वाढला होता. कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चाही काढला. ज्याला हिंसकवळण लागले आणि तोडफोडही झाली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिल्यामुळे नवा वादाला तोंड फुटू शकते. छत्रपती संभाजीनगर इथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर आंबेडकर यांनी फुलं वाहिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर अनेकांनी राजकारणातील वातावरण तापलेलं असतानाच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला का भेट दिली? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
तर भेटीनंतर आंबेडकर म्हणाले, खुलताबाद हे ऐतिहासिक शहर आहे, त्याचा लोकांनी विचार करावा. नावावरून भांडण लावण्याचा प्रकार सुरू आहे. त्यांना एवढच सांगतो औरंगजेबाने 50 वर्ष राज्य केलं, ते कुणाला मिटवता येणार नाही. तर औरंगजेबाचं राज्य आलं ते जयचंदमुळे आलं हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे. असे जयचंद बऱ्याच हिंदू राजांमध्ये होते, त्यांना तुम्ही शिव्या का घालत नाही? ही ताकद दाखवा ना. ज्यांनी या देशाला गुलाम केलं त्यांची निंदा करा असही ते म्हणाले.