“…तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभूकंप होईल”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. दरम्यान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभूकंप येणार असल्याचा मोठा दावा केला आहे.
सातारा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. दरम्यान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभूकंप येणार असल्याचा मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर खळबळ माजली आहे. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटाकडे 36 आमदार नाहीत. अजूनपर्यंत त्यांच्याकडे 36 आमदार दिसले नाहीत. अजित पवार गटाकडे 36 आमदार असते तर त्यांनी प्रदर्शन केलं असतं. त्यांचा फोटो काढला असता. अजित पवार गटाकडे दोन-तृतीयांश आमदार नसतील, तर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होईल.ज्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, ते सर्व आमदार निलंबित होतील.फुटीर गटातील आमदारांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर संबंधित आमदारांना विद्यमान विधीमंडळात मंत्री होता येणार नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे.”