ना रस्ता, ना रुग्णवाहिका! उपचारासाठी झोळी करुन 6 किमी पायपीट
डोंगरमाथ्यावर राहणारे, दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवाची आरोग्य सेवेसाठी फरफट सुरुच! मावळमधील व्हिडीओ समोर
रणजीत जाधव, प्रतिनिधी, TV 9 मराठी, पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune District) मावळ तालुक्यात (Maval) एका 55 वर्षीय महिलेला उपचारासाठी नेत असतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय. चक्क झोळी करुन या महिलेला उपचारासाठी नेण्यात आलं. आंदर मावळात डोंगर पठारावर सटवाईवाडी येथे राहणारी ही महिला आहे. उपचारासाठी (Medical Treatment) कामशेत येथे या महिलेला झोळीतून प्रवास करावा लागला. पुण्यासारख्या जिल्ह्यातील हे दयनीय चित्र आहे. आदिवासी भागातील लोकांना याआधीही आरोग्य सेवा मिळावण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचं पाहायला मिळालंय. आता मावळमधील डोंगर पठारावर राहणाऱ्या लोकांनाही मुलभूत सोयी सुविधांसाठी वंचित राहावं लागतंय, हे या घटनेतून अधोरेखित झालंय. मावळच्या डोंगर माथ्यावर राहणारे अनेक लोक लोणावळ्यातील बाजारात जाऊन रानमेवा विकतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. पण या बांधवाना आजारी पडल्यानंतर अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. रस्ताच नसल्यानं रुग्णावाहिका त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रश्न तर दूरच! पण अक्षरशः झोळी करुन डोंगर माथ्यावर राहणाऱ्या लोकांना दवाखान्यात जावं लागतंय. पाच ते सहा किलोमीटर पायपीट केल्याशिवाय कोणताही पर्याय या भागातील लोकासंमोर उरलेला नाही.