मोदींच्या दौऱ्यांचा खर्च भाजपाच्या खात्यात टाका, संजय राऊत यांची मागणी
एकदा का निवडणूका जाहीर झाल्या की पंतप्रधान हा केवळ कार्यवाहक पंतप्रधान असतो. त्यांना घोषणा करता येत नाही. सरकारी यंत्रणाचा फायदा उचलून प्रचार करता येत नाही, मात्र नरेंद्र मोदी यांनी या सरकारी यंत्रणेचा वापर करून आचारसंहिता भंग केली असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे
मुंबई : एकदा निवडणूका जाहीर झाल्या की पंतप्रधान केवळ कार्यवाहक राहतात. त्यामुळे पंतप्रधान सरकारी यंत्रणेचा वापर करुन प्रचाराला जाऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांचा खर्च भाजपाच्या खात्यातून निवडणूक आयोगाने वसुल करायला हवा अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. मोदींचा एक दौरा 25 कोटींचा असतो. आचारसंहिता केवळ विरोधी पक्षांसाठीच असते का ? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी मेरठ येथील सभेत भ्रष्टाचाऱ्यांना आपण सोडणार नाही असे म्हटले आहे. हा तर सर्वात मोठा जोक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांच्या आजूबाजूलाच दहा भ्रष्टाचारी बसले आहेत. रोज त्यांच्या पक्षात सरासरी पाच भ्रष्टाचारी सामील होत आहेत. या भ्रष्टाचाऱ्यांच्या भाजपात सामील झाल्यावर फाईल बंद केल्या जात आहेत. त्यामुळे सर्वात भाजपाच सर्वात भ्रष्टाचारी पार्टी झाली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.