Video | एका हाताने टाळी वाजत नाही ?, मग हा व्हिडीओ नक्कीच पाहा..
'एका हाताने कधी टाळी वाजत नाही' अशी म्हण आपल्याकडे सर्व भाषेत आहे. म्हणजे एखादे भांडण किंवा वाद एका बाजूने होत नाही तर दोन्ही बाजू किंवा व्यक्ती त्यास कारणीभूत असल्याचे सांगताना आपण ही म्हण वापरतो. परंतू ही म्हण खोटी ठरवणारा एका अवलिया पुढे आला आहे. शिर्डी येथील राहुल हा तरुण एका हाताने टाळी वाजवू शकतो. त्याच्या या कलेची दखल जमशेदपूरच्या एका संस्थेने घेत त्याला प्रमाणपत्र दिले आहे.
शिर्डी | 28 जानेवारी 2024 : ‘एका हाताने टाळी वाजत नाही’ ही म्हण बदलविणाऱ्या राहुल याच्या अनोख्या कलेला तुम्हीही दाद द्याल. आपली दृष्टी अधू असलेल्या राहुलने एका हाताने टाळी वाजविण्याचा अनोखा विक्रम केला आहे. एका हाताने टाळी वाजविण्याची कला शिकण्यासाठी राहुल याला 12 वर्षे लागली असे तो म्हणतो. राहुल दोन्ही डोळ्यांनी अंध असून तो गाणी म्हणतो डफ वाजवितो. तसेच हाताने टाळ वाजविण्याचा देखील आवाज काढतो. झारखंड जमशेदपूर येथील संस्थेने राहुल याच्या अनोख्या कलेची दखल घेत त्याला प्रमाणपत्र दिले आहे. राहुल हाताने भजन ठेक्यातील टाळ वाजवितो. पखवाजाच्या साथीचा टाळ वाजवितो. तसेच कव्वालीला साथ देणारा टाळही तो लिलया वाजवितो. त्याने आपण श्रीरामपुरला शिक्षणासाठी असताना गाणे शिकल्याचे म्हटले आहे. आपले शिक्षक वाणी सरांकडून पोवडा गायला शिकल्याचे राहुल सांगतो. त्याच्या गावातील हरिनाम सप्ताहात एक महाराज आले होते. त्यांच्याकडून त्याने प्रेरणा घेत एका हाताने टाळी वाजविण्याची कला अवगत केली. आपले हात सुरुवातीला खूप दुखायचे. आधी खूपच कमी यायचा, परंतू 12 वर्षांच्या परिश्रमानंतर आपण एका हाताने टाळी वाजवायला शिकल्याचे राहुल सांगतो.