आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 8 उमेदवारांची यादी काल जाहीर झाली. त्यात हातकणंगले येथून सध्याचे खासदार धैर्यशील माने यांना हातकणंगले येथून तिकीट मिळाले आहे. मात्र या निर्णयानंतर महायुतीत बंडखोरी होणार आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे यांनी लोकसभा लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
हातकणंगले : कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातून महायुतीने विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना काल उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर महायुतीतून बंडखोरीचे निशाण फडकले आहे. महायुतीचे आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. पंधरा वर्षे आम्ही वाट पाहातोय, आता नाही तर कधी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. महायुतीने तर उमेदवार जाहीर केला आहे. महाविकास आघाडीने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही. जर वेळ पडली तर अपक्ष म्हणून लोकसभा लढवू असे राहुल आवाडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज या संदर्भात चर्चा होणार आहे. त्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण असणार हे कळणार आहे. राहूल आवाडे, सत्यजीत पाटील आणि सुजीत निमसेकर यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.